ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरुन काँग्रेसनं भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. काळ्या यादीत असणाऱ्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला मेक इन इंडियात का सामील करुन घेतलं असा सवाल काँग्रेसच्या वतीनं विचारण्यात आला आहे. शनिवारी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्चन मिशेल याला पटीयाळाच्या कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मिशेलनं चौकशीदरम्यान सोनिया गांधींचं नाव घेतलं असा आरोप सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वकिलांनी कोर्टात केला होता. त्यानंतर आज रविवारी काँग्रेसने भाजपावर पलटवार केला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत भाजपावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काळ्या यादीतील कंपनी ऑगस्टा वेस्टलँडमध्ये मोदीजीच खरे ‘दामदार’ आहेत. ईडीच्या साह्याने सरकार काँग्रेसचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच मोदीजींच्या राज्यात ‘ईडी’ आता Embarrassing Disaster बनली आहे आणि ‘चौकीदार’च खरा ‘दागदार’ असेही ते म्हणाले.

ईडीने शनिवारी केलेल्या दाव्यानुसार, ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये देशाचा चौकीदारच खरा दागदार आहे. ऑगस्टा वेस्टलँडला काळ्या यादीतून बाहेर का काढले? ह्याचे उत्तर सरकारने द्यावे. जर मोदी सरकारने हे स्पष्ट केले नाही तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. २०१९ मध्ये भाजपाचा पराभव अटळ आहे. त्यानंतर आम्ही यावर चौकशी समिती नेमून दोषींना शिक्षा देण्याचे काम करू.

‘ऑगस्टा वेस्टलँड’ आणि ‘फिन मॅकेनिका’ला सरकारने ‘मेक इन इंडिया’चाच भाग बनवला. नौदलासाठी १०० हेलिकॉप्टर खरेदीची परवानगी दिली. मोदी सरकार ऑगस्टाप्रकरणी आंतराराष्ट्रीय न्यायालयात दाखल झालेले सर्व खटले हरले आहेत. मात्र, त्यांनी या निर्णयाविरोधात कोणतीही याचिका दाखल केलेली नाही. ऑगस्ट वेस्टलँडप्रकरणात जुलै २०१४ मध्ये मोदी आणि संरक्षण मंत्रालयाने अॅटर्नी जनरलशी चर्चा केली आणि त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये सरकारने काळ्या यादीतील ऑगस्टा वेस्टलँडचे नाव काढून टाकले.