काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचे ताशेरे झाडत चक्क त्यांच्या ‘नमो’ या जनतेनं प्रेमानं दिलेल्या नावाची व्याख्याच बदलली आहे. NAMO म्हणजे  ‘No Agriculture Mal-governance Only’ असा ट्विट करत अभिषेक मनु सिंघवी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

भाजप सरकार सूडाचं राजकारण करतं आहे, तसंच देशात असहिष्णुता कशी वाढीला लागेल याची पुरेपूर काळजी घेतं आहे; अशी टीका सिंघवी यांनी केली आहे. देशातल्या असहिष्णुतेमुळे भाजप नेतृत्त्वावरून लोकांचा विश्वास उडत चालला आहे. सीबीआयतर्फे विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या घरी आणि मालमत्तेवर छापेमारी करायची ही चाल सरकार जाणीवपूर्वक खेळतं आहे. व्यापम घोटाळा झाला तेव्हा सरकार झोपलं होतं का? असाही प्रश्न सिंघवी यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

कर्नाटकचे उर्जा मंत्री डी.के. शिवकुमार यांच्याशी संबंधित ६४ जागा आणि संपत्तीवर सीबीआयनं छापेमारी केली होती. गुजरातच्या ४४ आमदारांना बंगळुरूमधील ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं होतं तिथेही सीबीआयनं छापेमारी केली. डी.के. शिवकुमार यांनीच या सगळ्या नेत्यांना रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं.

याच छाप्यांप्रमाणे दिल्ली, तामिळनाडू येथील नेत्यांच्याही मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली होती. मागील महिन्यात राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीवर आणि मालमत्तांवरही सीबीआयनं छापेमारी केली होती. या सगळ्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत असल्याची टीका केली आहे.

काय आहे प्रकरण?
कर्नाटकचे उर्जा मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर करचोरीचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातम्यांनुसार आयकर विभागानं शिवकुमार यांचं घर आणि इतर भागांत असलेली मालमत्ता ही त्यांच्या उत्पन्नापेक्षा ३०० कोटींनी जास्त असल्याचं म्हटलं आहे. या ३०० कोटींमधले १०० कोटी रूपये शिवकुमार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे आहेत. तसंच १५ कोटी रूपयांचे सोन्याचे दागिनेही यात समाविष्ट आहेत.

आता याच सगळ्या प्रकरावरून तिळपापड झालेल्या काँग्रेसनं नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांच्या नमो या नावाची संकल्पनाच बदलून टाकली आहे.