पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जनतेला उद्देशून केलेले भाषण प्रभावहीन असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. पंतप्रधानांच्या भाषणात नवीन कल्पना, योजना आणि उपक्रमांचा अभाव असल्याचे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनी भाषण करत असल्याने, जनतेच्या त्यांच्याकडून खुप अपेक्षा होत्या. त्यामुळे आगामी पाच वर्षांसाठी सरकारची धोरणे, रणनिती यांसारख्या मुद्द्यांवर भाषणातून प्रकाश टाकला जाणे अपेक्षित होते. मात्र, नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे खूपच सामान्य असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली. काँग्रेस सरचिटणीस शकील अहमद यांनीही नरेंद्र मोदींचे भाषण प्रभावहीन असल्याची टीका केली. या भाषणात नवीन गोष्टींचा आणि कल्पनांचा अंतर्भाव नसल्याचे त्यांनी सांगितले.