देशात अस्थैर्य आणि अनागोंदी पसरविण्यासाठी काँग्रेस तिसऱ्या आघाडीला छुपा पाठिंबा देत असल्याचा आरोप भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी केला आहे.
केंद्रात आपली सत्ता येणार नाही याची पुरेपूर जाणीव काँग्रेसला झाली आहे आणि त्यामुळे देशात अस्थैर्य आणि अनागोंदी पसरविण्यासाठी काँग्रेस तिसऱ्या आघाडीला छुपा पाठिंबा देत आहे, असे भारती यांनी वार्ताहरांना सांगितले.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्यानेच काँग्रेस आता भाजपच्या वाटेत अडचणी निर्माण करीत आहे. देशातील जनतेला आता आघाडी सरकारचा उबग आला आहे, असा दावाही भारती यांनी केला.
नक्षलवाद, भ्रष्टाचार, महागाई आदी प्रश्न जनतेला भेडसावत असल्याने कणखर नेतृत्वाखालील एकाच पक्षाचे सरकार स्थापन होणे गरजेचे असून केवळ भाजपच ते देऊ शकतो. ही वस्तुस्थिती असल्यानेच जनता स्वत:हून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत आहे, असेही त्या म्हणाल्या.