राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसंदर्भात केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनी बुधवारी फोनवरून संवाद साधला. काँग्रेस पूर्णत: महाविकास आघाडीच्या पाठीशी असून करोनाविरोधातील लढय़ात सरकारला सर्वप्रकारे साह्य़ केले जाईल, असे आश्वासनही राहुल यांनी दिले.

महाराष्ट्रात आघाडीला सरकारला काँग्रेसचा फक्त पाठिंबा आहे. एखादे सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे या दोन्हीमध्ये फरक असल्याचे वक्तव्य राहुल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले होते. या विधानावरून राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारमधील कथित मतभेदांवर तर्कवितर्क केले गेले. आपण केलेल्या विधानाचा कोणताही गैरअर्थ नसून राज्य सरकार करोनाविरोधातील लढय़ात योग्य काम करत असल्याचे राहुल यांनी उद्धव यांना सांगितले. आघाडीत काँग्रेसशी दुजाभाव केला जाणार नाही. पक्षाला सन्मानाची वागणूक मिळेल. निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करून घेतले जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल यांना दिले.

सरकार स्थिर-पटोले

दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर आलेले विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचे पत्रकारांना सांगितले. विधासभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने राजकीय भूमिकेतून बोलणे योग्य ठरणार नाही. पण, राज्यात कुठलीही  आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली नाही. पटोले यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. करोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अधिवेशन घ्यायचे असेल तर कोणते मार्ग उपलब्ध असू शकतात, यावर दोघांमध्ये चर्चा झाली.

काँग्रेसचे मुख्यमंत्रीही ऐकत नाहीत?- भाजपची टीका

टाळेबंदी फोल झाल्याचा आरोप राहुल गांधी केल्यानंतर, भाजपने काँग्रेसच्या माजी अध्यक्षांवर जोरदार टीका केली असून, काँग्रेसचे मुख्यमंत्री देखील तुमचे ऐकत नाही का, असा सवाल केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

देशभर टाळेबंदी लागू होण्याआधी पंजाब, राजस्थानने टाळेबंदी घोषित केली. महाराष्ट्रानेही ३१ मेपर्यंत टाळेबंदी राहणार असे घोषित केले, असे प्रसाद म्हणाले. महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असून त्या राज्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केंद्रावर सातत्याने टीका केली जात असल्याचाही आरोप प्रसाद यांनी केला. टाळेबंदीनंतर काय असे राहुल विचारत आहेत पण, त्यांच्याकडे धोरण तयार असेल तर त्यांनी आधी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे. राहुल गांधी देशवासीयांचे मनोधैर्य खच्चीकरणाचे काम करत असल्याची टिप्पणीही प्रसाद यांनी केली.