‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणाचे निमित्त करून संसद ठप्प करणार काँग्रेस पक्ष न्यायालयीन व्यवस्थेचा अवमान करीत असून, त्यांचे हे वर्तनच लोकशाही विरोधी असल्याचा घणाघाती हल्ला संसदीय कामकाज मंत्री वैंकय्या नायडू यांनी केला. सभागृहात ५०० खासदारांना कामकाज व्हावे असे वाटते. परंतु काँग्रेसचे मूठभर खासदार काम रोखतात. हीच दडपशाही असल्याची घणाघाती टीका नायडू यांनी केली. सत्ताधारी भाजपकडून पहिल्यांदाच इतक्या आक्रमकपणे काँग्रेसला ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणावरून काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेस खासदारांनी सलग दुसऱ्या दिवशी कामकाजात व्यत्यय आणला. लोकसभेत कसेबसे गोंधळात कामकाज रेटण्यात आले. परंतु राज्यसभेत मात्र सत्ताधारी हतबल दिसले. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे आलेले वैफल्य व्यक्त करण्यासाठी काँग्रेस कामकाजात अडथळा आणत असल्याचे नायडू म्हणाले. पत्रकार परिषदेत नायडू यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.