कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजप या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांकडून तिकीट मिळवण्यात अपयशी ठरलेल्या काही इच्छुक उमेदवारांनी आता उमेदवारीसाठी जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाकडे धाव घेतली आहे.

अशा इच्छुक उमेदवारांपैकी पाच जण मंगळवारी बंगळूरुतील जद(एस)च्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांपैकी चौघांचे पक्षाध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी स्वागत केले. पाचवा इच्छुक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी चर्चा करणार होता.

सी. व्ही. रामननगर मतदारसंघातून काँग्रेसचे इच्छुक  पी. रमेश, भाजपचे माजी मंत्री हेमचंद्र सागर, काँग्रेसचे नेते जी. एच. रामचंद्रन व हनुमंतरायाप्पा हे जद (एस) मध्ये सामील झाले.

बंगळूरु पुलकेशीनगर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक  के. बी. प्रसन्न कुमार हे कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केल्यानंतर जद (एस) मध्ये प्रवेश करणार आहेत.

हत्येचा कट रचल्याचा मंत्री हेगडेंचा आरोप

बंगळूरु: केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या वाहनाला मंगळवारी रात्री अपघात झाला. मात्र हत्या करण्याचा हा प्रयत्न होता असा दावा हेगडे यांनी केला आहे. हवेरी जिल्ह्य़ात रानेबेन्नूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर उलट दिशेने येणारा एक ट्रक हेगडे यांच्या वाहनाच्या ताफ्यावर धडकला. प्रथमदर्शनी माझ्याच वाहनाला धडक देण्याचा हा प्रकार दिसत आहे, अशी ट्विप्पणी हेगडे यांनी केली आहे. यात हेगडे सुखरूप असले तरी ताफ्यातील एका वाहनाचे नुकसान झाले आहे.

‘मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय निकालानंतर’

बंगळूरु : कर्नाटकमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यास प्राधान्य आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय नंतर घेतला जाईल असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष जी.परमेश्वर यांनी दिले आहे. काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. त्याचा पक्षाच्या कामगिरीवर काहीही परिणाम होणार नाही असा दावा त्यांनी केला. मतदारसंघातील परिस्थिती पाहूनच उमेदवारी यादी निश्चित करण्यात आल्याचे परमेश्वर यांनी स्पष्ट केले. काँग्रेस मुख्यमंत्री सिद्धरामैया यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवत असली, तरी मुख्यमंत्रिपदाचे नाव पक्षाने घोषित केलेले नाही.