पाकिस्तानबाबत बोटचेपे धोरण, लष्करावर झालेले हल्ले, अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह, दलितांवरील अत्याचारांत झालेली वाढ, पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमती, धोक्यात आलेली महिलांची सुरक्षितता.. या सर्व मुद्दय़ांवर मोदी सरकारविरोधात येत्या दोन वर्षांत जनमत तयार करण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. रालोआ सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने हा निर्धार व्यक्त केला आहे.

सरकार स्थापनेच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त भाजपतर्फे उत्सव साजरा केला जात असतानाच काँग्रेसने मात्र केंद्राच्या अपयशाबाबत जनजागृती करण्यासाठी देशव्यापी मोहिमेची आखणी केली आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माध्यमप्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी केंद्राच्या अपयशी धोरणांची यादीच वाचून दाखवली. परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन, जीएसटी, आधार, तसेच यूपीएच्या काळातील योजनांनाच नवी नावे देणे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निश्चित धोरण नसणे या मुद्दय़ांवर या वेळी  सादरीकरण करण्यात आले.

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, हे सरकार सत्तेवर आले त्या वेळी त्यांनी ‘अच्छे दिन’ येणार असल्याच्या भूलथापा मारल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात देशातील जनतेचा भ्रमनिरास झाल्याचेच चित्र आहे. देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण असून त्याविषयी कोणी काही बोललेच  तर त्याच्यावर लगेचच देशद्रोही असल्याचा शिक्का मारला जातो असा आरोप त्यांनी केला.

तीन वर्षे कशाची साजरी करता-राहुल

नवी दिल्ली : सत्तेत आल्यानंतर तीन वर्षे कशाची साजरी करीत आहात, असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे. अकार्यक्षमता व न पाळलेल्या आश्वासनांची ही तीन वर्षे आहेत, असा टोला राहुल यांनी लगावला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व वाढत्या बेरोजगारीचा उल्लेख करीत जनमताचा विश्वासघात केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. युवकांना रोजगार मिळणे अवघड आहे, सीमेवर जवान शहीद होत आहेत. त्यामुळे कशाचा उत्सव करता असा सवाल केला आहे.