संसदेचे कामकाज ठप्प झाले असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव अद्यापही काँग्रेस पचवू शकली नसल्याने देशाचा ‘विनाश’ हाच काँग्रेसचा एककलमी कार्यक्रम असल्याचेही मोदी म्हणाले.
संसदेचे कामकाज उत्तम पद्धतीने पार पडण्यासाठी व्यापक चर्चा करून निर्णय घेण्याचे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून काँग्रेसचा सध्या विनाश हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे, असेही मोदी म्हणाले.
निवडणुकीत ज्यांना पराभव पत्करावा लागला ते आता आम्ही तुमचा नाश करू, देशाचे काहीही झाले तरी चालेल, आम्ही संसदेचे कामकाज होऊ देणार नाही, असे म्हणू लागले आहेत. काँग्रेसने संसदेच्या कामकाजाचा बाजार केला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. श्री नारायण धर्म परिपालन योगम कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला केरळचे मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांना प्रथम निमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर चंडी यांना कार्यक्रमापासून दूर राहण्यास सांगण्यात आल्याने कार्यक्रमात वाद निर्माण झाला.