करोना आणि लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी झळ बसली आहे. त्याचा परिणाम जीडीपीवर झाला असून, देशाच्या विकासदरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सेवा क्षेत्रांसह उद्योगांना फटका बसला असून त्याचा विपरित परिणाम रोजगार वृद्धीवर झाला आहे. घसरता जीडीपी आणि वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

करोनाचा प्रसार नियंत्रित करण्यसाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन ते अडीच महिने देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. या काळात अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि सेवा व उद्योग क्षेत्रांवर झाला. याचा मोठा आर्थिक फटका बसला असून, रोजगाराच्या संधीही प्रचंड घटल्या. दरम्यान या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वेगळा लूक बघायला मिळाला. पंतप्रधानांनी दाढी व मिशा वाढवल्या आहेत.

आणखी वाचा- “मी जे अर्थव्यवस्थेबद्दल बोललो त्यानंतर काय झालं बघा आणि आता मी…”; राहुल यांचा सूचक इशारा

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी दोन्ही गोष्टींवरून मोदींवर निशाणा साधला आहे. “हिंमत असेल तर जीडीपी, रोजगार वाढवा. दाढी मिशा तर कोणीही वाढवू शकतो,” असा टोला मोदींना लगावला आहे.

आणखी वाचा- “पंतप्रधान मोदींकडे दृष्टीकोन नसल्यामुळेच आज…”; राहुल गांधींची बोचरी टीका

मागील महिन्यातच इंडिया रेटिंग्जने विद्यमान वित्तीय वर्ष २०२०-२१चा सकल देशांतर्गत उत्पादनाचा वृद्धीदर नकारात्मक राहण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वृद्धीदर असलेली भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रथमच नकारात्मक वृद्धीदर राहणार असून मागील ४१ वर्षांतील हा नीचांकी दर असेल, असं रेटिंग्जनं म्हटलं होतं. टाळेबंदीमुळे बंद झालेले महसुली मार्ग आणि अर्थसंकल्पाबाहेरील खर्चांमुळे राज्यांना कर्ज उचल करावी लागत असल्याने राज्यांची वित्तीय तूट वर्ष २०२०-२१ साठी सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ४.५ टक्कय़ांपर्यंत पोहोचेल, असा अंदाजही व्यक्त केलेला आहे.