राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबद्दल चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अनौपचारिक भेटीसाठी निमंत्रित केले आहे. मात्र सोनिया गांधी यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित करणे टाळले आहे. उद्या (शुक्रवारी) सोनिया गांधी विरोधी पक्षातील नेत्यांसोबत भोजन करणार आहे. याचवेळी विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा होणार आहे. नरेंद्र मोदी सरकार तीन वर्ष पूर्ण करत असतानाच ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येतो आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठकीसाठी स्वत: विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील जवळपास सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत. माकपचे वरिष्ठ नेते सीताराम येचुरी, त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या बैठकीला हजेरी लावणार आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी बुधवारी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्यांनी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची स्वतंत्रपणे भेट घेत राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबद्दल चर्चादेखील केली आहे. केजरीवाल यांना सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीचे निमंत्रण दिलेले नाही. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आतापर्यंतच्या विरोधी पक्षांच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभाग घेतला नसल्याने त्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालच्या विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी बॅनर्जी मोदी यांची भेट घेणार आहे. मात्र यावेळी बॅनर्जी मोदींसोबत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबतदेखील चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधकांचा उमेदवार कोण असेल आणि त्यावर सर्वांचे एकमत होणार का, यावरुन ममता बॅनर्जी त्यांची भूमिका ठरवणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. मात्र आपला प्रतिनिधी या बैठकीत सहभाग होईल, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आधीच दिल्लीला रवाना झाले आहेत. बहुजन समाज पक्षाच्या मायावतीदेखील त्यांचा प्रतिनिधी या बैठकीसाठी पाठवणार आहेत. यासोबतच द्रमुकदेखील ज्येष्ठ नेत्याला या बैठकीसाठी दिल्लीला पाठवणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीत उपस्थित असणार आहेत.