News Flash

“मोदीजी तुम्ही देशातल्या मीडियाला ‘हेडलाइन’ तर दिली, पण देशाला…”

"तुम्ही तुमच्या भाषणातून देशातील मीडियाला वृत्त छापण्यासाठी हेडलाइन तर दिली, पण देशाला...

(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संग्रहित छायाचित्र)

करोना संकटाविरोधातील लढ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा मंगळवारी केली. 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती येईल असे मोदी म्हणाले. आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील आणि आधीच्या तीन टप्प्यांपेक्षा लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरूप नवे असेल, असेही पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले. मोदींच्या भाषणानंतर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.

मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. मात्र, आपल्या भाषणादरम्यान गावाकडे, घराकडे परतणाऱ्या मजुरांच्या सद्य परिस्थितीबाबत ते बोलले नाहीत. यावरुन काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. “पंतप्रधान मोदीजी, तुम्ही तुमच्या भाषणातून देशातील मीडियाला वृत्त छापण्यासाठी ‘हेडलाइन’ तर दिली, पण देशाला अद्यापही मदतीच्या ‘हेल्पलाइन’ची गरज आहे….घरी परतणाऱ्या मजूर, कामगार, गरिब वर्गातील नागरिकांना सर्वात प्रथम मदत मिळणे गरजेचं आहे… तुम्ही त्याबाबत काही घोषणा कराल अशी अपेक्षा होती… पण, देश आणि राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर व श्रमिकांप्रति आपल्या निष्ठुरता आणि असंवेदनशीलतेमुळे निराश आहोत…”अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली आहे. याशिवाय, जाहीर केलेलं पॅकेज सत्यात उतरण्याची वाट पाहात आहोत, असेही सुरजेवाला म्हणाले. ट्विटरद्वारे सुरजेवाला यांनी ही टीका केली.

दरम्यान, काल (दि.१२) देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करत असून, हा निधी देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या दहा टक्के आहे. त्याची बुधवारपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देतील, असे मोदींनी स्पष्ट केले. करोनाच्या आपत्तीनंतर केंद्राने, तसेच रिझव्‍‌र्ह बँकेने वेळोवेळी जाहीर केलेल्या मदतीचाही ‘आत्मनिर्भर भारत मदत योजने’त समावेश असेल. हा मदतनिधी देताना जमीन, रोजगार, रोखता आणि नियम या चारही आर्थिक बाबींचा विचार करण्यात आला आहे. त्याद्वारे वस्त्रोद्योग, सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग, मजूर, मध्यम वर्ग, उद्योग यांना साह्य़ केले जाईल, असेही मोदी म्हणाले. टाळेबंदीत हालअपेष्टा सहन करणाऱ्या लाखो स्थलांतरित मजुरांचाही मोदींनी उल्लेख केला. या मजुरांच्या कल्याणावरही आर्थिक मदतीतून लक्ष केंद्रित केले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. तसेच, मोदींनी चौथ्या लॉकडाउनसंदर्भातही संकेत दिले. आधीच्या तीन टप्प्यांपेक्षा लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरूप नवे असेल, असे मोदींनी स्पष्ट केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 8:08 am

Web Title: congress chief spokesperson randeep surjewala says india disappointed by pms lack of empathy for migrants sas 89
Next Stories
1 Coronavirus Update : महाराष्ट्रात आज ४२२ रुग्णांना डिस्चार्ज
2 चीनमध्ये करोनाचे सोळा नवे रुग्ण
3 ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोठा निधी
Just Now!
X