काँग्रेस आणि माकपने पश्चिम बंगालमधील जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत अनेक जागांबाबतचा तिढा सोडविण्यात आला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमेन मित्रा आणि प्रदीप भट्टाचार्य शनिवारी माकपचे मुखपत्र असलेल्या गणशक्तीच्या कार्यालयात गेले आणि माकपचे राज्य सचिव सूर्यकांत मिश्रा आणि अन्य नेत्यांशी चर्चा केली. जागावाटपावरून निर्माण झालेला तणाव निवळण्याच्या दृष्टीने ही चर्चा झाली.

बैठकीतील चर्चा फलदायी आणि सकारात्मक झाली. मुर्शिदाबाद वगळता अन्य जिल्ह्य़ांमधील जागांबाबतचा तिढा सोडविण्यात आला. काही जागा सोडण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे, उत्तर बंगालमध्ये आम्हाला काही नव्या जागा मिळाल्या आहेत, असे या बैठकीला हजर असलेल्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी आणि माकपच्या नेतृत्वामध्ये मुर्शिदाबादमधील जागावाटपाची थेट चर्चा होणार आहे.

पश्चिम बंगालमधील तृणमूल आणि भाजप आघाडीचा पराभव करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. सदर अपवित्र आघाडीला पराभूत करण्यासाठी आमची काहीही करण्याची तयारी आहे, असे मिश्रा म्हणाले.

तृणमूलशी थेट लढत -चौधरी

निवडणुकीत ९० टक्क्यांहून अधिक जागांवर आमची तृणमूल काँग्रेसशी थेट लढत होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी शनिवारी सांगितले. आपल्या पक्षाशी आघाडी करण्याबाबत माकपच्या ‘सकारात्मक’ भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

तृणमुलचे उमेदवार जाहीर

कोची: केरळमधील विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने शनिवारी आपल्या ७० उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. आपण लवकरच केरळच्या दौऱ्यावर येणार असून पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि माकपच्या अपवित्र युतीचे पितळ उघडे पाडणार आहोत, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. केरळमधील तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शंकरनेल्लूर यांनी  नावांची यादी जाहीर केली.

मोदी मार्चअखेरीला पश्चिम बंगाल दौऱ्यावर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्च महिनाअखेरीस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले.मोदी यांच्या प्रचार दौऱ्यासाठी प्रदेश भाजपने काही तारखा सुचविल्या आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी आम्ही मोदींकडे तारखांची मागणी केली असून त्यांच्या किमान १० जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहेत. मात्र अद्याप त्याबाबत दुजोरा मिळालेला नाही, असे घोष म्हणाले.मोदी यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि अन्य केंद्रीय नेत्यांनाही तारखा देण्याची विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्र, हरयाणा, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनाही प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.