काँग्रेस कार्यसमितीची सोमवारची बैठक वादळी ठरली. मात्र, हंगामी पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहतील, असा निर्णय सात तासांच्या वादळी चच्रेनंतर घेण्यात आला. करोनास्थिती निवळल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले जाणार असून, त्यात नव्या अध्यक्षाची निवड होईल. काँग्रेस नेतृत्व आणि पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेची मागणी करणाऱ्या २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या पत्राची दखल घेत कार्यसमितीच्या बहुतांश सदस्यांनी या नेत्यांवर तीव्र टीका केली. तसंच राहुल गांधी यांनी या नेत्यांवर केलेल्या कथित आरोपांनंत कपिल सिब्बल यांनी आधी नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सिब्बल यांनी ट्विट करत आपल्यासाठी देश सर्वाधिक महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. “हा कोणत्याही पदाचा प्रश्न नाही. हा माझ्या देशाचा प्रश्न आहे जो सर्वाधिक महत्त्वाचा आहे,” असं सिब्बल म्हणाले. दरम्यान, सिब्बल यांच्या ट्विटर हँडलवरूनही अनेक शंका व्यक्त करण्यात येत आहेत. सोमवारी पार पडलेल्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेस हे नाव हटवलं आहे.

आणखी वाचा- ‘या’ काँग्रेस नेत्याच्या घरी झालेल्या डिनरमध्ये काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवण्याचं प्लानिंग

पत्रावरून वादंग

काँग्रेस नेतृत्व आणि पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेची मागणी करणाऱ्या २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या पत्राची दखल घेत कार्यसमितीच्या बहुतांश सदस्यांनी बैठकीदरम्यान या नेत्यांवर तीव्र टीका केली. पूर्णवेळ उपलब्ध असणारे, तसेच सामूहिक नेतृत्व असावे, जिल्हा स्तरापासून केंद्रीय स्तरावर निवडणुकीद्वारे सदस्यांची निवड करण्याची मागणी पत्रात करण्यात आली होती. यासंदर्भात बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, सोनिया गांधींना पक्ष कारभारात मदत करण्यासाठी तसेच, पत्रातील मुद्यांवर विचार करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात येणार आहे. सर्व ठरावांना पक्षनेतृत्वाला पत्र पाठविणारे नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जितेंद्र प्रसाद, मुकूल वासनिक यांनीही पाठिंबा दिला. पक्ष संघटनेतील फेरबदलाचे सर्व अधिकार सोनिया गांधी यांना देण्याचा ठरावही संमत करण्यात आला, अशी माहिती संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल व प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

आणखी वाचा- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवर चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

आझाद, सिबल यांचे नाटय़पूर्ण घूमजाव

भाजपशी हितसंबंधातून पत्र लिहिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांवर केल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. हे सिद्ध केले तर पक्षातील सर्व पदाचा राजीनामा देऊ, अशी आक्रमक भूमिका घेणारे गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींच्या कथित विधानावर घूमजाव केले. कपिल सिबल यांनी राहुल यांना प्रत्युत्तर देणारे ट्वीट काढून टाकले.