राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आजच्या (रविवार) बैठकीत काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत ३०० जागांवर विजय मिळवण्याची रणनिती बनवली आहे. या बैठकीत रालोआ विरोधात आघाडी बनवण्यावर चर्चा झाली. पण याचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे असावी अशी अट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी ठेवली.

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी २०१९ च्या निवडणूक रणनितीसाठी एक प्रस्ताव सादर केला. चिदंबरम म्हणाले की, १२ राज्यात काँग्रेस मजबूत आहे. जर पक्षाने आपल्या क्षमतांमध्ये ३ पट वाढ केली तर १५० जागा जिंकता येऊ शकते. त्याचबरोबर इतर राज्यात आघाडीच्या मदतीने काँग्रेस १५० जागा आणखी जिंकू शकते, असा फॉर्म्युला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

या बैठकीत २०१९ च्या निवडणूक आघाडीबाबत चर्चा झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पायलट, शक्तीसिंह गोहिल, रमेश चेन्निथला यांनी आघाडीत काँग्रेस केंद्रबिंदू राहिली पाहिजे आणि त्याचा चेहरा राहुल गांधी असले पाहिजेत अशी भूमिका मांडली.

दरम्यान, काँग्रेसची कार्यकारिणी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याला जोडणाऱ्या सेतू प्रमाणे काम करते. समितीतील सर्व सदस्यांनी देशातील पीडित आणि मागास वर्गातील लोकांसाठी काम करावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी बैठकीत केले. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. सोनिया गांधी यांनीही बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. केंद्रात भाजपाचे आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मोदींच्या भाषणातून निराशा दिसल्याचा टोला त्यांनी लगावला.