गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘गुजरात मॉडेल’ राज्यकारभारासंबंधी खुली चर्चा करावी, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे. आर्थिक आघाडीवर सरकारची वाटचाल कूर्मगतीने होत असल्याबद्दल मोदी यांनी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली होती. त्यास प्रत्युत्तर देताना काँग्रेसने हे आव्हान दिले आहे.
भाजपवर विविध मुद्दय़ांवर टीकास्र सोडतानाच या पक्षाने ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्याविरोधात उघडलेल्या आघाडीबद्दलही केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी भाजपवर शरसंधान केले आणि दारिद्रय़रेषेचा दर खाली आल्याबद्दल भाजप दुहेरी चाल का खेळत आहे, अशी विचारणा केली.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दररोज काही ना काही बोलण्याची सवय आहे. ‘गुजरात मॉडेल’बद्दल त्यांना एवढी खात्रीच असेल तर त्यांनी त्यांच्या सोयीने केव्हाही आणि कोठेही आमच्यासमवेत जाहीर चर्चेसाठी यावे. जेणेकरून त्यांच्या त्या मॉडेलमध्ये किती बळ आहे, ते तरी स्पष्ट होईल आणि वस्तुस्थिती काय आहे, तेही लोकांना स्पष्ट होईल, असे आव्हान तिवारी यांनी दिले.
योग्य नेतृत्व आणि यूपीए सरकारला आलेला धोरणलकवा देशाची आर्थिक धोरणे खालावण्यास कारणीभूत ठरलेला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली होती. गुजरातमधील मानवी हक्क उल्लंघनासंबंधीही तुम्ही जाहीर चर्चेसाठी मोदी यांना आव्हान देणार काय, असा प्रश्न विचारला असता ही बाब एवढी खुली आहे की त्यावर चर्चाच करण्याची अजिबात आवश्यकता नसल्याचे उत्तर तिवारी यांनी दिले.

व्हिसाबाबत भूमिका संदिग्धच
नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्याच्या मुद्दय़ावरून वादंग माजलेला असतानाच मोदी यांना अमेरिकेचा दौरा करण्याची अनुमती देण्यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे अमेरिकेने टाळले आहे. मात्र, मोदी यांनी व्हिसासाठी अर्ज केला तर अमेरिकेतील इमिग्रेशन कायदे आणि धोरणाच्या चौकटीत त्यांचा अर्ज बसतो काय, याचा विचार निश्चितपणे केला जाईल, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी पत्रकारांना सूचित केले. अर्थात मोदी यांच्यासंबंधीच्या आमच्या धोरणात बदल झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.