कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देशातील सर्वोच्च पदाची जबाबदारी सोपविण्याची तयारी कॉंग्रेसने पक्ष पातळीवर सुरू केलीये. पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नसले, तरी त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात झालीये.
राहुल गांधी यांना कशा पद्धतीने देशातील सर्वोच्च पदाचे उमेदवार म्हणून घोषित करायचे, यासाठी कॉंग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीने गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने बैठका घेतल्या. राहुल गांधी यांच्या नावाची थेटपणे कोणतीही घोषणा करण्यात येणार नसली, तरी तेच पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असा संदेश लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी रणनिती आखण्यात आली आहे. याच रणनितीचा एक भाग म्हणून राहुल गांधी यांच्या देशातील २५ राज्यांच्या राजधान्यांमध्ये जाहीर सभा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या राजधान्यांमधील सर्वसामान्य नागरिकांशीही ते संवाद साधतील.
राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतल्यामुळे सामान्य मतदारांपर्यंत योग्य तो संदेश नक्की जाईल, असे पक्षातील इतर नेत्यांना वाटते. या विषयावर मतदारांमध्ये कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये, याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.
देशातील वेगवेगळ्या प्रश्नांवर स्वतःची भूमिका मांडण्यासाठी राहुल गांधी लवकरच दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.