मंगळूरु : मंगळूरुमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील (सीएए) आंदोलनाला हिंसक वळण लागून गुरुवारी त्यामध्ये दोन जण ठार झाले त्यांच्या कुटुंबीयांची त्याचप्रमाणे आंदोलनामध्ये जखमी झालेल्यांची विचारपूस करण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाला परवानगी नाकारण्यात आली आणि त्यांना विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेही चार्टर्ड विमानाने बंगळूरुहून मंगळूरु येथे जाणार होते, मात्र त्यांच्या विमानालाही विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांनी आपला दौरा रद्द केला.

काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील, माजी गृहमंत्री एम. बी. पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. रमेशकुमार आणि माजी खासदार व्ही. एस. उगरप्पा यांचा समावेश आहे. रमेशकुमार आणि उगरप्पा यांना अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीत नेण्याचा प्रयत्न केला असता तेथे शाब्दिक चकमक उडाली.

शिष्टमंडळाला रोखण्याची कृती लोकशाहीविरोधी आणि हिटलर राजवटीसारखी आहे, आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, आपण विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहोत, हिंसाचारात जे जखमी झाले त्यांची आम्हाला भेट घ्यावयाची आहे, त्याचप्रमाणे मंगळूरुच्या जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करून शांततेचे आवाहन आम्हाला करावयाचे आहे, असे एस. आर. पाटील म्हणाले.

बंगळूरुमध्ये सिद्धरामय्या म्हणाले की, जनतेशी चर्चा करण्याचा आणि सत्या जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार कर्नाटकला दुसरे काश्मीर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

काँग्रेसशासित राज्यांमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी नाही – वेणुगोपाळ

कोची : सुधारित नागरिकत्व कायदा घटनाविरोधी असल्याने काँग्रेसशासित राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. हा घटनाविरोधी कायदा आहे, घटनाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांवर जबरदस्ती करता येऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. देशाच्या अनेक भागांमध्ये या कायद्याविरोधात निदर्शने केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर वेणुगोपाळ यांनी वरील बाब स्पष्ट केली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांसह निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ वेणुगोपाळ यांच्या नेतृत्वाखाली अलापुझ्झा जिल्ह्य़ात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होते.