शाहीन बाग, जामियातील आंदोलनावरून मोदी यांचे विरोधकांवर टीकास्त्र

सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात शाहीन बाग, जामिया, सीलमपूर येथे एकाचवेळी होत असलेल्या आंदोलनामागे मोठा कट आहे. देशहिताला बाधा पोहोचवणारा राजकीय प्रयोग केला जात आहे. या कारस्थानाला ‘आप’ आणि काँग्रेसचा पाठिंबा आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपने शाहीन बागेतील आंदोलनाला असलेला विरोध आणखी तीव्र केला आहे. मोदींनी सोमवारी दिल्लीत घेतलेल्या पहिल्याच प्रचारसभेत शाहीन बागेतील आंदोलन म्हणजे अराजक असल्याची टीका केली.

‘दिल्लीत एकाचवेळी होणारी आंदोलने हा निव्वळ योगायोग आहे असे तुम्हाला वाटते का? तसे अजिबात नाही. हे आंदोलन एखाद्या कायद्याविरोधात असते तर ते कधीच संपले असते. पण, या आंदोलनाच्या माध्यमातून देशात दुफळी निर्माण करण्याचा राजकीय प्रयोग केला जात आहे. आप आणि काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला.

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शाहीन बागेतील आंदोलन हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला असून भाजपचे नेते प्रक्षोभक भाषणे करत आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार परवेश वर्मा यांना निवडणूक आयोगाने प्रचार करण्यास बंदी घातली आहे. हा वाद ताजा असतानाच मोदी यांनी शाहीन बागेतील आंदोलकांना लक्ष्य केले. संविधान आणि तिरंगा हातात घेऊन ते आपल्याला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना भेडसावणाऱ्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा हा डाव आहे. आता त्यांना रोखण्याची जबाबदारी दिल्लीकर मतदारांची असल्याचेही मोदी म्हणाले.

तिसऱ्यांदा गोळीबार

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या ‘गोली मारो..’ या वादग्रस्त विधानानंतर जामिया मिलिया इस्लामिया आणि शाहीन बाग येथे वेगवेगळ्या दोन माथेफिरू तरुणांनी आंदोलकांवर पोलिसांसमोरच गोळीबार केला. त्यानंतर रविवारी रात्रीही जामियाजवळ गोळीबार झाला. चार दिवसांतील गोळीबारीची ही तिसरी घटना आहे.  त्यामुळे सोमवारी शाहीन बागेत आंदोलनस्थळावर स्थानिक लोकांनी सुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली. आंदोलनस्थळावर जाण्याआधी बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी केली जात होती.

भाजपने आंदोलकांवर टीका केली असली तरी शाहीन बागेतील आंदोलन मात्र कायम आहे. सोमवारीही शाहीन बागेत मोठय़ा संख्येने आंदोलक जमले होते. दिल्लीबाहेरून आंदोलकांना पाठिंबा देणाऱ्यांची भाषणेही सुरूच होती. आंदोलकांवर गोळीबार करण्यापेक्षा पंतप्रधान मोदींनी एकदा तरी शाहीन बागेतील आंदोलकांशी संवाद

साधायला हवा. मोदी चच्रेला का घाबरतात, असा सवाल व्यासपीठावरून केला जात होता. आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोणालाही पसे दिलेले नाहीत. ना कोणी रोख दिले ना कोणी पेटीएमचा वापर केला, असे समन्वय समितीच्या सदस्यांकडून सातत्याने जाहीरपणे सांगितले जात होते.