स्वराज, राजेंविरुद्ध काँग्रेस पुन्हा आक्रमक
पावसाळी अधिवेशनात गाजलेले ‘ललितगेट’ काँग्रेसने पुन्हा एकदा उकरून काढले आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी ललित मोदी यांना मदत केल्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अडचणीत आल्या होत्या. ललित मोदीला भारतात आणण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ब्रिटिश सरकारला विनंती केल्याची आठवण करून देत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला आहे. ललित मोदीला भारतात कधी परत आणणार, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी उपस्थित केला.
संपुआ सरकारने ललित मोदींना भारतात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारशी पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. सेवा व वस्तू कर विधेयक मंजुरीच्या अपेक्षेत असलेल्या केंद्र सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा ललित मोदी प्रकरण उकरून काढले आहे.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी कशीबशी सरकारची बाजू मांडली असली तरी त्याने काँग्रेसचे समाधान झालेले नाही. विकासाऐवजी केंद्र सरकार सातत्याने वादग्रस्त विषयांसाठी चर्चेत राहील, याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ललित मोदी प्रकरणावरून पुन्हा एकदा राजे व स्वराज यांना लक्ष्य करण्यात येईल, असा दावा काँग्रेस पक्ष सूत्रांनी केला. हे प्रकरण यापूर्वीच संपले असल्याची सारवासारव पात्रा यांनी केली. मात्र ललित मोदी यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने काय प्रयत्न केले आहेत, यावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच हिवाळी अधिवेशनदेखील सुरळीत पार पडू न देण्याचे संकेत काँग्रेस नेते देत आहेत. त्यात साक्षी महाराज, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरल्ला खट्टर, वी. के. सिंह यांच्यासारखे नेते वादग्रस्त विधाने करून भाजपला अडचणीत आणत आहेत. विशेष म्हणजे उत्तर भारतीयांना कायदा मोडण्याची हौस असते, असे विधान करून गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी बिहारमध्ये पक्षाला तोंडघशी पाडले. या साऱ्या पाश्र्वभूमीवर बिहारमध्ये अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या काँग्रेसने हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे.