कायद्याची कथितरीत्या बोगस पदवी मिळवल्याबद्दल न्यायालयीन खटल्यात अडकलेले दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्रसिंग तोमर यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘नैतिक आधारावर’ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
तोमर यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात यावे या मागणीचा पुनरुच्चार करतानाच, या मागणीसाठी पक्ष आंदोलन सुरूच ठेवेल असेही काँग्रेसने सांगितले आहे. केजरीवाल हे नेहमी उच्च नैतिकतेच्या गोष्टी करतात, परंतु या प्रकरणात ते तोमर यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करतो, असे दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या. नैतिकदृष्टय़ा तोमर यांनी कायदामंत्री म्हणून पदावर राहायला नको.  तोमर यांच्या बोगस पदवीबाबत लोकांना माहिती देऊन त्यांना हटवण्याच्या मागणीसाठी आम्ही संपूर्ण दिल्लीच्या कानाकोपऱ्यात आंदोलन करू, असे मुखर्जी म्हणाल्या.