मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी महिलांबद्दल अश्लील वक्तव्य केल्यामुळे गौर आणि त्यांचा भाजप महिलांना कशी वागणूक देतो, हे उघड झाले असून त्यामुळे गौर यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी मंगळवारी येथे केली.
बाबूलाल गौर यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपदही भूषविले असल्यामुळे त्यांच्याविरोधातील टिकेला धार आली आहे. धोतर कसे नेसावे आणि महिला राजकारण्यांच्या गळ्यात पडत असल्याबद्दल शेरेबाजी केल्याप्रकरणी गौर चांगलेच अडचणीत आले आहेत.
भाजपच्या राज्यस्तरीय संमेलनात बोलताना गौर यांनी वादग्रस्त विधाने केली होती. रशियाच्या दौऱ्यात असताना तेथील महिलांनी आपल्या गळ्यात पडून कपाळाचे चुंबन घेतले परंतु आपण त्यांना लगेचच बाजूला सारले, असे सांगण्यास गौर विसरले नाहीत. आपण धोतर कसे नेसता, यासंबंधीही रशियन महिलांनी आपल्याला विचारणा केली.
परंतु ही बाब जाहीररीत्या सांगण्याजोगी नाही, खासगीपणे सांगू शकतो, असे सांगत या सर्व बाबी छायाचित्रांसह छापून आल्या तर भाजपची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही, असेही गौर यांनी या संमेलनात सांगून टाकले.
 गौर यांची ही मुक्ताफळे ऐकून संमेलनास उपस्थित असलेले राज्यस्तरीय नेतेही अडचणीत आले होते. दरम्यान, त्यांच्या या शेरेबाजीवरून सोशल मीडियावरही देशभरातून मोठय़ा प्रमाणावर टीका होत आहे.