21 February 2019

News Flash

पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणा- पी चिदंबरम

पेट्रोल आणि डिझेल यांचे दर त्यावर असलेल्या करांमुळे वाढत आहेत जर हे दर जीएसटीच्या कक्षेत आणले गेले तर ते कमी होतील असेही चिदंबरम यांनी म्हटले

पी. चिदंबरम ((संग्रहित छायाचित्र)

पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे अशी मागणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत, ते नियंत्रणात आणण्यासाठी जीएसटीच्या कक्षेत आणावेत असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. यासंदर्भातले ट्विट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

पेट्रोल आणि डिझेल यांचे दर त्यावर असलेल्या करांमुळे वाढत आहेत. आत्ता असणारे कर कमी करून त्यावर जर जीएसटी लावण्यात आला तर दर नक्कीच कमी होतील आणि सामान्य जनतेला दिलासा मिळेल. त्यामुळे काँग्रेसची ही आग्रही मागणी आहे की केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल हे तातडीने जीएसटीच्या कक्षेत आणावे.

पेट्रोल किंवा डिझेल यांचे दर का वाढले? असा प्रश्न विचारण्यात आला की केंद्र सरकार राज्यांकडे बोट दाखवते मात्र त्याला काहीही अर्थ नाही. देशात १९ राज्यांमध्ये भाजपाचेच सरकार आहे मग त्या राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती का भडकल्या आहेत असाही प्रश्न पी चिदंबरम यांनी उपस्थित केला. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून त्यावर पर्याय काढला पाहिजे असेही त्यांनी सुचवले आहे.

डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत घसरली आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. या किंमती वाढल्याने महागाई वाढणार हे उघड आहे. त्याचमुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

First Published on September 4, 2018 7:25 am

Web Title: congress demands that petrol and diesel be brought under gst immediately