निवडणूक हरण्याची भीती असल्याने काँग्रेसने जनतेचे लोकशिक्षण केले नाही किंवा लोकांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न केले नाहीत. अशी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली.
लोक हुशार झाले तर सत्ता जाईल हे काँग्रेसला माहीत आहे. नेहरू-गांधी घराण्याच्या चार पिढय़ांनी केवळ त्याच त्याच गोष्टी बोलल्या मात्र केले काहीच  नाही असे टीकास्त्र येथील सभेत मोदींनी सोडले. २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शनिवारी संपला. निवडणुका आल्या की काँग्रेसला गरिबांची आठवण येते, असा टोला मोदींनी लगावला. मध्य प्रदेश विकासाच्या मार्गावर नेण्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचे मोदींनी सांगितले.  दिग्विजय सिंह यांना मोदींनी लक्ष्य केले. दहा वर्षांपूर्वी या व्यक्तीने राज्याचे वाटोळे केले.
मात्र त्यानंतर मोठे बदल झाले आहेत. लोकशाहीत सभ्य भाषा वापरा असा सल्ला दिग्विजय सिंह देत आहेत. मात्र काँग्रेसच्या महिला खासदारांबाबत काही दिवसांपूर्वी ते काय बोलले आठवावे असा टोला त्यांनी दिग्विजय सिंहांना लगावला.