काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी खासगी दौऱ्यासाठी परदेशात निघून गेल्याने पक्षाच्या वर्धापनदिनी, सोमवारी नेत्यांची कोंडी झाली. अत्यंत महत्त्वाचे वैयक्तिक कारण असल्यामुळेच ते विदेशात गेले आहेत, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांना द्यावे लागले. भाजपने मात्र राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली.

राहुल यांच्या आजीची प्रकृती गंभीर असल्याने ते इटलीला गेले असून काही दिवसांत देशात परततील. वैयक्तिक कारणांसाठी विदेशात जाण्याचा व्यक्तीला अधिकार नाही का, असा उलट सवाल राहुल यांचे निष्ठावान आणि संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना केला. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या एकदिवसआधी राहुल इटलीतील मिलानला गेले आहेत.

राहुल नसल्याने पक्षाच्या मुख्यालयात प्रियंका गांधी-वढेरा यांच्या उपस्थितीत १३६ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी कार्यक्रमात सहभागी झाल्या नव्हत्या. राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा तसेच, ए. के. अ‍ॅण्टनी या नेत्यांनी कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर, ‘वादग्रस्त शेत कायदे तातडीने मागे घेतले पाहिजेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना उत्तरदायी असून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, हे आंदोलन राजकीय कारस्थान नव्हे’’, असे प्रियंका म्हणाल्या. राहुल यांच्या गरहजेरीबद्दल त्यांनी उत्तर देणे टाळले.

देशहिताच्या लढय़ासाठी काँग्रेस सुरुवातीपासून कटिबद्ध आहे. आज, काँग्रेसच्या स्थापनादिनी सत्य आणि समानता या दोन्ही मूल्यांवर पुन्हा एकदा काँग्रेस निष्ठा व्यक्त करत आहे, असे ट्वीट राहुल यांनी विदेशातून केले. काँग्रेस म्हणजे सेवा असून सातत्याने होत असलेल्या बदलांचे प्रतीक असल्याचे ट्वीट राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले.

भाजपकडून टीकेची झोड

भाजपने राहुल यांच्या इटलीवारीवरून लक्ष्य केले. काँग्रेस वर्धापन दिन दिवस साजरा करत आहे आणि राहुल गायब (नौ-दो-ग्यारह) झाले आहेत, असा टोमणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मारला. राहुल गांधी हे राजकारण गांभार्याने घेत नाहीत याची काँग्रेसलाही जाणीव आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका करणे एवढेच ते करतात, अशी टीका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते केशव मौर्य यांनी केली.