आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणात पोलिसांनी नोटीस बजावल्यानं सचिन पायलट यांनी बंड पुकारलं. त्यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहिलं होतं. मात्र, काँग्रेसनं पायलट यांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केलं. राजस्थानमध्ये अचानक उफाळलेल्या या बंडाळीमुळे काँग्रेस सर्तक झाली असून, राज्यभरातील सर्व जिल्हा व गट समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली.

आणखी वाचा- भाजपाकडून आमदारांचा घोडेबाजार, २०-२० कोटींना खरेदी केलं जातंय; अशोक गेहलोत यांचा आरोप

माजी उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसचं राजस्थानमधील सरकार अडचणीत आलं होतं. अशोक गेहलोत व पायलट यांच्यामधील मतभेद प्रथमच टोकाला पोहचल्याचं बघायलं मिळालं. रविवारपासून सुरू झालेल्या या राजकीय बंडामुळे राजस्थानात बऱ्याच घडामोडी घडल्या. काँग्रेसनं सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केलं. त्यानंतर आता संपूर्ण राजस्थानमध्ये नव्यानं पक्ष बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा- “उत्तम इंग्लिश बोलणं, हॅण्डसम दिसणं हेच सर्वकाही नसतं”, गेहलोत यांचा सचिन पायलट यांना टोला

काँग्रेसचे राजस्थानमधील प्रभारी प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी यासंदर्भात महत्त्वाचं ट्विट केलं आहे. “राजस्थानमधली सर्व जिल्हा काँग्रेस समित्या, गट समित्या तात्काळ बरखास्त करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस समितीनं घेतला आहे. नवीन समित्या नियुक्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल,” पांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- …म्हणून मी बंड पुकारलं, सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केलं जाहीर भाष्य

हे ट्विट करण्यापूर्वी पांडे यांनी सचिन पायलट यांच्याविषयी एक ट्विट केलं होतं. ज्यात सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. ईश्वर त्यांना सद्बु्द्धी देवो आणि त्यांना त्यांची चूक समजून यावी. भाजपाच्या मायावी जाळ्यातून ते बाहेर निघून यावे, अशीच माझी प्रार्थना आहे, असं पांडे यांनी म्हटलं होतं.