सध्या कर्नाटक काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटक काँग्रेसची प्रदेश समिती बरखास्त केली आहे. येथील प्रदेश समिती जरी बरखास्त झालेली असली तरी देखील प्रदेश अध्यक्ष व कार्यकारी प्रदेश अध्यक्ष यांचे पद कायम आहे. पुर्वीप्रमाणेच तेच या पदावर राहणार आहेत. तर या निर्णया अगोदर काँग्रेसने आमदार रोशन बेग यांना पक्षातून निलंबीत केले होते.

तर कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी या निर्णयाबद्दल बोलतांना सांगितले की, काँग्रेसने केपीसीसीचे अध्यक्ष व कार्यकारी अध्यक्ष यांना कायम ठेवत प्रदेश समिती बरखास्त केली आहे. आम्ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीची पुर्नबांधणी करावी लागेल, अशी विनंती केली होती. राहुल गांधी यांनी आमची मागणी मान्य करत समिती बरखास्तीचे आदेश दिले आहेत. आता आम्हाला केवळ प्रदेश समितीचेच नाही तर जिल्हा काँग्रेस आणि ब्लॅाक काँग्रेस समितीची देखील कशी पुर्नबांधणी करता येईल हे पाहावे लागणार आहे. आगामी निवडणुकांच्या अगोदर नवी समिती तयार करावी लागणार आहे.

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी याबाबत सांगितले आहे की, मला सांगण्यात आले आहे की, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती बरखास्त करण्यात आलेली आहे. मात्र गुंडूराव हे अद्यापही केपीसीसीचे अध्यक्ष म्हणुन कायम आहेत. आता नव्या समितीच्या घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. पात्र व्यक्तीसच पक्ष नव्या समितीत स्थान देईल.