काँग्रेसने केवळ पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचे अस्थिकलश फिरवण्यासाठीच देशव्यापी यात्रा काढल्या, अशी सणसणीत टीका भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली. ते शुक्रवारी रांची येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना गांधी घराण्यावर शरसंधान साधले. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या या पक्षाने आजपर्यंत केवळ चार देशव्यापी यात्रा काढल्या. त्यापैकी पहिली यात्रा जवाहरलाल नेहरू यांचा अस्थिकलश घेऊन काढण्यात आली. दुसरी यात्रा ही इंदिरा गांधी आणि तिसरी देशव्यापी यात्रा ही राजीव गांधी यांचा अस्थिकलश घेऊन काढण्यात आली. त्यानंतर आता राहुल गांधी कोणताच कलश न घेता यात्रेसाठी निघालेत, असा टोला अमित शहा यांनी लगावला.

याउलट आमच्या पक्षाने अगदी जनसंघाच्या काळापासून गोहत्या बंदी, गोवा मुक्तिसंग्राम, काश्मीर ते कन्याकुमारी एकता यात्रा, राम जन्मभूमी आंदोलन, सोमनाथ अशा अनेक मुद्द्यांवर देशव्यापी दौरे केले. भाजप केवळ निवडणुका जिंकण्याचा विचार करत नाही. तर आम्ही लोकांची विचारपद्धती बदलली आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

यापूर्वी राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या भाषणावरही अमित शहा यांनी टीक केली होती. ‘अयशस्वी नेते भाषणे देण्यासाठी अमेरिकेला पळतात. कारण मायदेशात त्यांचे कोणीही ऐकून घेत नाही,’ असे म्हणत शहांनी नाव न घेता राहुल यांच्यावर निशाणा साधला होता. याशिवाय, राजकारणातील घराणेशाही बाजूला सारण्यात भाजपचा मोठा वाटा असल्याचेही शहांनी सांगितले होते. राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणात घराणेशाहीचा उल्लेख होता. ‘संपूर्ण देशात घराणेशाही आहे. अखिलेश यादव यांच्यापासून अभिषेक बच्चन यांच्यापर्यंत सगळीकडेच घराणेशाही पाहायला मिळते,’ असे राहुल गांधींनी म्हटले होते.