सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव, पक्षात सुरू असलेलेल राजीनामा सत्र असे अनेक प्रकार घडत असतानाच आणखी एक संकट आता काँग्रेसवर आले आहे. राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या अध्यक्षपादाच्या राजीनाम्यानंतर अद्याप काँग्रेसला नवा अध्यक्ष शोधण्यात अपयश आले आहे. तसेच काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही आपले राजीनामे दिले आहेत. याचाच परिणाम काँग्रेसच्या कार्यप्रणालीवरही झाल्याचे दिसून येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसवर आपल्या खर्चात कपात करण्याची नामुष्की ओढावली आहे. तसेच पक्षाच्या अन्य विभागांना देण्यात येणाऱ्या निधीतही कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस सेवादलाच्या मासिक खर्चात कपात करण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली. यापूर्वी काँग्रेस सेवादलाला महिन्याला अडीच लाख रूपयांचा निधी देण्यात येत होता. आता त्यात कपात करून 2 लाख रूपये करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पक्षाने महिला काँग्रेस, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि युवा काँग्रेसच्या खर्चातही कपात केली आहे. याव्यरिक्त निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही अद्याप वेतन मिळाले नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. केवळ काँग्रेस संघटनेच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळाले आहे. तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागातही आता 55 पैकी 35 जण कार्यरत आहेत. निवडणुकीतील पराभवानंतर सोशल मीडिया विभागातील काही कर्मचाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही उशीराने वेतन मिळाले.

दरम्यान, कार्यकारिणीची बैठकीसाठी लवकरच तारीख ठरवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सूत्राकडून देण्यात आली. तसेच यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्षपद सांभाळण्याची विनंती केली. परंतु त्यांनी याला नकार दिल्याचेही सांगण्यात आले. हंगामी अध्यक्षपदासाठी पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यामध्ये मुकुल वासनिक, मिल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नावांचा समावेश आहे. परंतु ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपण सध्या अध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे सांगितले होते.

दरम्यान, 100 वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या काँग्रेसची आज अनेक ज्येष्ठ नेते साथ सोडताना दिसत आहेत. तेलंगण, कर्नाटक आणि गोव्यासारख्या राज्यांमध्येही अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यातच काँग्रेसवर कर्नाटकात सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या 79 आमदारांपैकी 13 आमदारांनी आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारवर संकट ओढावले आहे. तर गोव्यातही चंद्रकांत कवळेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या 10 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. तेलंगणमध्येही काँग्रेसच्या 18 आमदारांपैकी 12 आमदारांनी पक्षाची साथ सोडून तेलंगण राष्ट्र समितीत प्रवेश केला होता.