भारतीय जनता पक्षाची वेबसाईट मंगळवारी हॅक झाली असून अद्यापही डाऊन आहे. यादरम्यान काँग्रेसने भाजपाला मदतीचा हात देत पाय खेचण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट (http://www.bjp.org/) हॅक झाली आहे. हॅक केल्यानंतर हॅकर्सने वेबसाईटवर अक्षेपार्ह शब्द लिहिले होते. याबाबत अद्याप भाजपाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

दरम्यान या परिस्थितीचा फायदा घेत काँग्रेसने ट्विट केलं आहे की, ‘सुप्रभात @BJP4India…इतक्या वेळानंतरही तुम्ही अद्याप डाऊन असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. जर तुम्हाला बॅक अप मिळवण्यासाठी काही मदत हवी असेल तर आम्ही तयार आहोत’.

मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भाजपाची वेबसाईट हॅक झाली होती. अद्यापही वेबसाईट डाऊन आहे. भाजपाच्या वेबसाईट http://www.bjp.org/ वर लॉग इन केलं असता आम्ही लवकरच परत येऊ असा संदेश दिसत आहे.

वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकरने नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तसेच या व्हिडीओवर अक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले होते.