काँग्रेस विरोधकांची भूमिका निभावण्यातही अयशस्वी ठरली आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. गेल्या चार वर्षात काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा खरा चेहरा समोर आला असल्याचंही ते म्हणाले आहेत.

‘गेल्या चार वर्षात काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आधी लोकांनी त्यांना चांगलं सरकार देण्यास अपयशी ठरल्याबद्दल तसंच निर्णय घेण्याची अक्षमता आणि भ्रष्टाचारामुळे सत्तेवरुन खाली खेचलं. आणि आता ते विरोधकांची भूमिका निभावण्यातही अपयशी ठरत आहेत’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

‘जर काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खरंच एकत्र काम करुन गेल्या चार वर्षांत लोकांसमोर मुद्दे आणले असते, तर लोकांनी किमान त्यांच्यावर विश्वास तरी ठेवला असता. पण गेल्या चार वर्षात त्यांना काही पडलेली नाही. निवडणूक जवळ आल्याने आता सगळे एकत्र आले आहेत’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.