X
X

हिंदीला प्राधान्य: 23 भाषांचा उल्लेख करत राहुल गांधींचा अमित शाहंवर अनोखा निशाणा

READ IN APP

अमित शाह यांनी भाषणादरम्यान ‘एक देश, एक भाषा’ असा संकेत दिला होता.

हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्याने तीच देश एकसंध ठेवू शकते, असे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या ‘एक देश, एक भाषा’ असा संकेत दिल्याने वाद उफाळला होता. असदुद्दीन ओवेसी, एम. के. स्टॅलीन आणि कमल हासन यांनीदेखील शाह यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनीदेखील यात उडी घेतली आहे. भारतात हिंदी व्यतिरिक्त बोलल्या जाणाऱ्या अन्य भाषा या आपल्या दुबळेपणा नाहीत, असं म्हणत त्यांनी शाह यांच्यावर निशाणा साधला.

‘‘प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा वापर केला पाहिजे, पण त्याचबरोबर देशाच्या विविध भागांमध्ये हिंदीचाही प्रसार झाला पाहिजे. देशात अनेक भाषा आहेत, त्यांचे वेगळे महत्त्व आहे. पण संपूर्ण देशाची भाषा एक असली पाहिजे. तीच जगात देशाची ओळख बनू शकते. देशाला एकसंध ठेवणारी भाषा कोणती असेल तर ती हिंदी आहे. त्यामुळे लोकांनी मातृभाषेबरोबरच हिंदीचा वापर करून बापू आणि सरदार (गांधी व वल्लभभाई) यांचे ‘एक भाषा’ हे स्वप्न साकार करावे’’, असे शाह हिंदी दिनानिमित्त म्हणाले होते.

यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. तसंच त्यांनी प्रत्येक भाषेसमोर भारताचा तिरंगा लावला आहे. ओडिया, मराठी, कन्नड, हिंदी, तामिळ, इंग्रजी, गुजराती, बंगाली, उर्दू, पंजाबी, कोंकणी, मल्याळम, तेलुगू, आसामी, बोडो, डोगरी, मैथिली, नेपाळी, संस्कृत, कश्मीरी, सिंधी, मणिपुरी अशा भाषा लिहिल्या आहेत. तसंच या भाषा दुबळेपणा नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, शाह यांच्या वक्तव्यानंतर एम.के.स्टॅलिन आणि कमल हासन यांनीदेखील टीका केली होती. “हा इंडिया आहे, हिंदिया नव्हे’, हिंदीच्या वर्चस्वामुळे अनेक राज्ये त्यांचे कायदेशीर अधिकार गमावू शकतात. सोमवारी यासंदर्भात पक्षाची उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल, त्यानंतर याबाबत काय पावलं उचलायची याची आखणी केली जाईल. पण, ज्या राज्यांच्या कायदेशीर अधिकारांवर हिंदीच्या वर्चस्वामुळे गदा येऊ शकते अशा सर्व राज्यांना एकत्र आणण्यामध्ये आम्हाला अजिबात संकोच वाटणार नाही”, अशी प्रतिक्रिया स्टॅलिन यांनी दिली. तर “1950 मध्ये विविधतेत एकता या वचनासोबत भारत प्रजासत्ताक झाला. प्रत्येक भाषा आणि संस्कृतीचा आदर केला जाईल आणि त्यांची सुरक्षितता अबाधित राखली जाईल असं आश्वासन जनतेला देण्यात आलं होतं. आता कोणी शाह, सुलतान किंवा सम्राट आमचा हा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. देशातील लोकांवर कोणतीही एक भाषा थोपवली जाऊ शकत नाही आणि जर असं झाल्यास तर मोठं आंदोलन होईल,” अशा शब्दांत हासन यांनी संताप व्यक्त केला होता.

21

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Just Now!
X