पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम 22 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील टेक्सासमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील सहभागी होणार आहेत. एकमेकांना खेळकरपणे अथवा मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी अमेरिकेत हाऊडी हा शब्द वापरण्यात येतो. परंतु आता या कार्यक्रमावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींची फिरकी घेतली आहे. ‘हाऊडी’ अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावरून त्यांची फिरकी घेतली आहे. ‘हाऊडी’ अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे? ‘वाटत नाही की चांगली आहे’ #HowdyEconomy अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित देशाचा जीडीपी ग्रोथ रेट 5 टक्क्यांवर आला आहे. तर वाहन क्षेत्रासह अन्य काही क्षेत्रांमध्येही मंदीचं वातावरण आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून विरोधी पक्षांनी आता सरकाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी सरकारनेही काही घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तीन घोषणा केल्या असून आणखी एक बुस्टर पॅकेजचीदेखील घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकारावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेत आयोजित होणाऱ्या ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमावरून निशाणा साधला आहे.