करोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच करोनाला हरवण्यासाठी आपल्याला चाचण्या वाढवायला हव्या असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच गरजू लोकांपर्यंत दर आठवड्याला आपण अन्नधान्य पोहोचवायला हवं, असंही त्यांनी नमूद केलं.

आपण साठवलेलं धान्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यापर्यंतही धान्य पोहोचलं पाहिजे. आपल्याकडे अधिकचं धान्य साठवलं आहे. आता पुन्हा तो साठा वाढेल. त्यामुळे धान्य गरजूंपर्यंत पोहोचलं पाहिजे. १० किलो तांदूळ, १० किलो गहू, १ किलो डाळ, १ किलो साखर दर आठवड्याला गरजुंना सरकारनं द्यावं, असं राहु ल गांधी यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- १० लाख लोकांमागे फक्त १९९ चाचण्या, राहुल गांधींनी सांगितल्या १० महत्वाच्या गोष्टी

बरोजगारीची मोठी समस्या
करोनामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र यानंतर आधीच बेरोजगारीच्या संकटाशी झगडणाऱ्या आपल्या देशाला याच बेरोजगारीच्या आणखी मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी केंद्राने पॅकेज जाहीर करावं अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. सध्या सरकारने काय केलं नाही काय करायला हवं होतं या सगळ्या चर्चांची वेळ नाही. सध्या एकजुटीने करोनाच्या संकटाचा सामना करायला हवा असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आपल्या आर्थव्यवस्थेवर प्रचंड तणाव येणार आहे. मात्र या संकटाचा सामना करावाच लागणार. सध्याच्या घडीला माणसाचं आयुष्य वाचणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. मात्र त्याचवेळी व्हायरस आपली अर्थव्यवस्था नष्ट करणार नाही याचीही काळजी आत्तापासून सरकारने घ्यायला हवी असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- करोनाशी लढाई सुरु आहे, आजच विजयाची घोषणा नको- राहुल गांधी

एकजुट हवी
लघू उद्योगांना, शेतकऱ्यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच भारत एकजूट करुन उभा राहिला तर या संकटाचा सामना सहजरित्या करु शकतो. या व्हायरसला हरवू शकतो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.