काँग्रेसने क्रोधाशी कडवी झुंज देत स्वाभिमान जपला असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांची पाठ थोपटली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारात चांगल्याप्रकारे साथ दिली अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. निवडणूक निकालांनंतर राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. भाजपने या निवडणुकांमध्ये खालच्या स्तराचे राजकारण केल्याची अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली.

‘जनतेचा कौल काँग्रेस पक्षाने मान्य केला असून दोन्ही राज्यातील सरकारला शुभेच्छा. गुजरात आणि हिमाचलच्या जनतेचे मी आभार मानतो. काँग्रेस कार्यकर्त्यांचा मला फार अभिमान वाटतो. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात कारण, क्रोधाशी कडवी झुंज देत तुम्ही स्वाभिमानसुद्धा जपला,’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.

वाचा : गुजरात निवडणुकीत ‘नोटा’चे आश्चर्यकारक आकडे 

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच राहुल यांच्याकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यांच्यात नेतृत्वाखाली या दोन्ही राज्यांतील निवडणुका लढवल्या गेल्या. गुजरातमध्ये काँग्रेसला जरी यश मिळाले नसले तरी मागील निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा निश्चितच वाढल्या. राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रचारादरम्यान मोठा बदल घडलेला दिसून आला. मतपेटीतही त्याचा परिणाम दिसून आला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.