राष्ट्रपिता म. गांधी, सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांचे जनतेला जोपर्यंत स्मरण राहील तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘काँग्रेसमुक्त-भारत’ आवाहन फलद्रूप होणार नाही, असे काँग्रेसचे नेते बेनीप्रसाद वर्मा यांनी म्हटले आहे.
ज्या पंतप्रधानांनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली त्यांनीच प्रथम सरदार पटेल, म. गांधी आणि आता पं. नेहरू यांचे स्मरण केले ही उत्तम गोष्ट आहे. या नेत्यांच्या स्मृती जोपर्यंत जनतेच्या मनांत आहेत तोपर्यंत देश काँग्रेसमुक्त होणार नाही, असेही वर्मा म्हणाले.
पं. नेहरू हे खरे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष नेते होते, देशाच्या समस्या सोडविण्यासाठी देशाच्या नेत्यामध्ये हे गुण असणे आवश्यक आहे. मात्र सध्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या अंगी समाजवाद अथवा धर्मनिरपेक्षता हे गुण नाहीत, अशी टीकाही वर्मा यांनी मोदींवर केली.