काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांची नियोजित पत्रकार परिषद रद्द केली आहे. आपल्या देशावर झालेला हल्ला हा सर्वात दुर्दैवी आहे, राजकारण करण्याची ही वेळ नाही असे प्रियंका गांधींनी म्हटले आहे. राजकारणावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही देशात जे घडलं आहे त्या परिस्थितीचं गांभीर्य राखून मी पत्रकार परिषद रद्द करते आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या लखनऊ येथील रोड शोला खूप चांगला प्रतिसादही मिळाला. आज त्या पत्रकार परिषद घेणार होत्या मात्र पुलवामा येथील हल्ल्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात देशाचे 40 जवान शहीद झाले आहेत. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही ही आपण सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आहे. जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच या हल्ल्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, दहशतवाद्यांना विसरता येणार नाही असा धडा शिकवू असे अरूण जेटली यांनी म्हटले आहे.

दरम्यान या हल्ल्याचा देशभरातून निषेध होतो आहे. काँग्रेसनेही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. राजकारणात सक्रिय झाल्यापासून प्रियंका गांधी यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन मिनिटं मौन पाळलं आणि पत्रकार परिषद रद्द केली. ही वेळ राजकारण करण्याची नाही. आपल्या देशाचे जवान शहीद झालेले असताना राजकीय गोष्टी पाळणं मला पटत नाही म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.