काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी अखेर शनिवारी सकाळी सोनभद्र हत्यांकाडातील पीडित कुटुंबांची भेट घेतली. मिर्झापूरमधील चुनार गेस्ट हाऊसवर प्रियंका गांधी थांबल्या होत्या तिथे पीडितांच्या कुटुंबियांना आणण्यात आले. शुक्रवारी प्रियंका गांधी यांना पीडित कुटुंबांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले. प्रियंका गांधी संपूर्ण रात्र मिर्झापूरमधल्या चुनार गेस्ट हाऊसमध्ये थांबल्या होत्या.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना माघारी परतण्यास सांगितले. पण पीडित कुटुंबांची भेट घेतल्याशिवाय आपण इथून जाणार नाही असे प्रियंका गांधी यांनी ठणकावून सांगितले. अखेर शनिवारी सकाळी पीडित कुटुंबांना चुनार गेस्ट हाऊसवर आणण्यात आले. तिथे प्रियंका गांधी यांनी पीडितांची भेट घेतली. आस्थेनेच त्यांची विचारपूस केली.

दरम्यान तृणमुल काँग्रेसच्या शिष्टमंडळालाही वाराणसी विमानतळावर रोखण्यात आले आहे. हे शिष्टमंडळही सोनभ्रद हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी आले आहे. तृणमुलचे शिष्टमंडळही विमानतळावर धरणे आंदोलनासाठी बसले आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.