गुजरात निवडणुकांच्या काळात कोणताही पक्ष काहीही सहजरित्या घेण्याच्या मनस्थितीत नाही. गुजरात निवडणुकीत काँग्रेसला इव्हीएमवर भरवसा नाही, त्यामुळे कोणतीही साधी चूक होऊ नये यासाठी काँग्रेसकडून आपल्या कार्यकर्त्यांना इव्हीएमच्या सर्व बारीकसारीक गोष्टींच्या माहितीसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेसने निवडणूक काळात मोबाईल जॅमरची मागणी केली आहे. तर भाजपने हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅडची मागणी केली आहे. गांधीनगरच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दररोज राजकीय पक्षांकडून आलेल्या नव्या मागण्यांचा पाऊस पडत आहे.

काँग्रेसकडून आपल्या प्रत्येक उमेदवारांच्या निवडक समर्थकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि स्वंयसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. काँग्रेसने ५ टक्के इव्हीएम मशिन्सच्या एक हजारवेळा तपासणीचे निर्देश दिले आहेत.

या प्रशिक्षणात भाग घेतलेल्या एका काँग्रेस कार्यकर्त्याने सांगितले की, आम्हाला इव्हीएमचे सील तपासण्यास सांगण्यात आले. तसेच काँग्रेसच्या चिन्हावरच मतदान होते का हे तपासायला सांगितले. कारण भाजप या निवडणुकीत नक्कीच काहीतरी गडबड करु शकते अशी शंका काँग्रेसला आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाला तशा सूचना दिल्या आहेत.

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी यूपी निवडणुकीनंतर गुजरात निवडणुकीवर देखील शंका उपस्थित केली आहे. आम्ही सर्व केंद्र आणि बुथवरील २५ टक्के व्हीव्हीपॅटच्या तपासणीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. तर निवडणूक आयोगाने इव्हीएमसोबत छेडछेड होणे शक्यच नाही असा दावा केला आहे.