सध्याच्या घडीला फक्त कुलुपांचे उत्पादक तेजीत आहेत अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली आहे. कारण कंपन्यांना कुलुपं लागत आहेत. त्यामुळे सध्या कुलुपांचे उत्पादक तेजीत आहेत अशी टीका गौरव वल्लभ यांनी केली आहे. हरयाणा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात गौरव वल्लभ यांनी हा आरोप केला आहे. भाजपावर टीका करण्याची एकही संधी सध्या काँग्रेस सोडतना दिसत नाही. त्याच अनुषंगाने गौरव वल्लभ यांनी भाजपावर टीका केली आहे.

भाजपा सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदी आली आहे. आता तेजीत आहे तो फक्त कुलुपांचा व्यवसाय कारण कंपन्या बंद करण्यासाठी ही कुलुपं कामी येत आहेत. महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. याबाबत चर्चेसाठी बोलवण्यात आलेल्या कार्यक्रमात गौरव वल्लभ यांनी ही टीका केली.

केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदी आली आहे. कृषी, ऑटो, उत्पादन यांसह सगळ्याच क्षेत्रांमध्ये मंदीचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ अशी घोषणा मोदी सरकारने पहिल्या टर्मच्या वेळी केली होती. मात्र वर्षाला २ कोटी रोजगार सोडा लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. कंपन्यांना टाळं लागतंय. त्यामुळे फक्त कुलुपं बनवणारे उत्पादक तेजीत आहेत असं गौरव वल्लभ यांनी म्हटलं आहे.