कॉंग्रेस सरकारला केवळ निवडणुकीवेळीच आदिवासींची आठवण येते. गेल्या ५० वर्षांत कॉंग्रेसने आदिवासींसाठी काहीही केले नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.
मध्य प्रदेशातील शाहदोलमधील जाहीर सभेमध्ये मोदी यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कॉंग्रेसवर हल्ला चढविला. ते म्हणाले, कॉंग्रेसला खरंच आदिवासींसाठी काही करायचे असते, तर त्यांनी त्यांच्यासाठी वेगळे मंत्रालय केले असते, अर्थसंकल्पात आदिवासींसाठी वेगळी तरतूदही केली असती. मात्र, त्यांनी ५० वर्षे सत्ता उपभोगून तसेच काहीच केले नाही. भाजपचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या सत्ताकाळात आदिवासींसाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद केली. आजही कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये आदिवासी भागात पुरेशा सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील दुर्गम भागात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.