बिहारमध्ये स्वबळावर सत्तास्थापनेची स्वप्ने पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे मनसुबे उधळण्यासाठी काँग्रेस जदयूला युती करण्याचा प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. जनता परिवारातील सदस्य मुलायम सिंह यादव व नितीशकुमार यांच्यात राजकीय महत्त्वकांक्षेचा संघर्ष असल्याने काँग्रेसने जदयूशी युती करण्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत. काँग्रेस महासचिव शकील अहमद यांनी जनता परिवाराच्या विलीनीकरणानंतरच आमच्यासमोर सर्व पर्याय खुले होतील, असे सूचक वक्तव्य केले. जदयूशी युतीबाबत त्यांनी बोलण्याचे टाळले. मात्र काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना विरोध असल्याने ऐनवेळी नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाला समर्थन देऊन काँग्रेस पक्ष जदयूशी हातमिळवणी करण्याचे डावपेच आखत
आहे.
जनता परिवार संघटित झाल्यास भाजपपेक्षा काँग्रेसचे जास्त नुकसान होण्याची भीती राहुल गांधी यांना आहे. त्यामुळे जदयूशी चर्चा सुरू केल्याचा दावा काँग्रेस सूत्रांनी केला. अर्थात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार काँग्रेसशी युती करण्यास सध्या तरी फारसे अनुकूल नाहीत.
शरद यादव स्वत जनता परिवारासाठी आग्रही आहेत. मात्र लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केल्यास विरोधकांना मोठा मुद्दा मिळेल व लाभ होण्याऐवजी जदयूला नुकसान होण्याची शक्यता असल्याने नितीशकुमार जनता परिवाराच्या एकत्रीकरणाला अनुकूल नाहीत. बिहारमधील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी वॉर रूम उभारण्यात आली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री जतीन मांझी यांना भाजपने आत्तापासूनच बळ देण्यास प्रारंभ केला आहे. नितीशकुमार व काँग्रेस एकत्र आल्यास लालूप्रसाद यादव व माँझी यांची युती घडवून आणण्याची रणनीती सध्या भाजपमध्ये आखली जात आहे.
बिहारमध्ये अस्तित्वासाठी लढणाऱ्या लोकजनशक्तीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी भाजप ठरवेल तो मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार मान्य असल्याचे घोषित करून शरणागती पत्करली. भाजप व काँग्रेससाठी बिहारची निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने सर्व समीकरणांची चाचपणी करण्यास खुद्द भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भूपेंद्र यादव यांना निर्देश दिले आहेत.

‘नितीशकुमार यांनी निर्णय घ्यावा’
जनता परिवाराच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली असताना राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे आघाडीबाबतचा चेंडू टोलविला आहे. जद(यू) आणि राजद आघाडी करण्यास अथवा धर्मनिरपेक्ष पक्षांची व्यापक आघाडी करण्याची आपली तयारी असल्याचे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबतचा निर्णय घेण्याची हीच वेळ आहे, असे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे.विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे आपण एकत्र बसून आघाडी, निवडणुका, जागावाटप आणि अन्य प्रश्नांवर त्वरेने निर्णय घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले.