काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेतील विषयांवर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी एका सल्लागार गटाची स्थापना केली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या सल्लागार गटात ११ सदस्य असतील. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम यांचाही समावेश आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विषय सध्या चर्चेत आहेत. देशातील आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था याचबरोबर भविष्यासंदर्भातील वेगवेगळ्या विषयांवर पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी आणि ती जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने हा सल्लागार गट तयार केला असल्याचे समजते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या सल्लागार गटाचे अध्यक्ष असतील. तर राहुल गांधी, रणदीपसिंग सुरजेवाला, के.सी.वेगणुगोपाल, पी.चिदंबरम, मनिष तिवारी, जयराम रमेश, प्रविण चक्रवर्ती, गौरव वल्लभ आणि रोहन गुप्ता हे या सल्लागार गटाचे सदस्य असतील.

सल्लागार गट सामान्यत: रोजच्या निरनिराळ्या विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आणि विविध मुद्द्यांबाबत पक्षाची मते मांडण्यासाठी व्हिडीओ कॉन्फसन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.