काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डी.के.शिवकुमार यांची भेट घेतली. तिहारमध्ये जाऊन सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांची विचारपूस केल्याचं म्हटलं जात आहे. सकाळी ९ वाजता सोनिया गांधी तिहारमध्ये पोहोचल्या. शिवकुमार आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यापूर्वी सोनिया गांधी यांनी आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या पी. चिदंबरम यांचीही तिहारमध्ये जाऊन भेट घेतली होती.

काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी ईडीने अर्थात सक्तवसुली संचलनालयानं अटक केली होती. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेनंतर काँग्रेसमधले दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनाही ईडीने समन्स बजावले होते. गेल्याच वर्षी ईडीने शिवकुमार यांच्याविरोधात मनी लाँड्रिगचे प्रकरण दाखल केले होते. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कथित कर चोरी, हवाला यांच्या आधारे शिवकुमार यांच्या विरोधात काही प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत.
यापूर्वीही २०१७ मध्ये डी. के. शिवकुमार यांच्या ६४ ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. दरम्यान, या छाप्यांचा आणि मनी लाँड्रींग प्रकरणाशी संबंध नाही असेही शिवकुमार यांनी म्हटले होते. त्यानंतर ३० ऑगस्टला रोजी त्यांना ईडीने समन्स बजावले होते. आता ईडीने त्यांना अटक केली.

ईडीने नोव्हेंबर २०१८ मध्ये शिवकुमार यांना नोटीस बजावली होती. परंतु शिवकुमार यांनी चौकशीसाठी हजर न राहण्याची सुट मागितली होती. परंतु त्यांना ईडीकडून दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर त्यांनी याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयानं त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती.