भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. काँग्रेस दुहीचे राजकारण खेळत आहे. या वाळवीपासून देशाला मुक्त करून विकासाच्या मार्गावर नेण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगत, सपा आणि बसपावरही चौफेर हल्ला केला. आग्रा येथे आयोजित निवडणुक प्राचरभेत ते बोलत होते.
काँग्रेसचे वर्तन उद्दामपणाचे आहे, लोकांची त्यांना चिंता नाही. देशाची प्रगती व्हावी, चित्र बदलावे अशी इच्छाही त्यांना नाही. केवळ मतपेढीचे राजकारण करण्यामध्ये त्यांना रस असल्याचा आरोप मोदींनी केला. ७५ टक्के लोकांकडे ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोदींनी केला. फूट पाडून राज्य करण्यात त्यांना रस आहे. समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यात मतपेटीच्या राजकारणाची चढाओढ सुरु असल्याचा आरोप मोदींनी केला. या राजकारणापायी देशाचे वाटोळे झाल्याची टीका मोदींनी केली. विकासाच्या मार्गावरून जाण्याची गरज आहे. भाजप विकासाचे राजकारण करते असा दावा मोदींनी यावेळी केला.