सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्ष महाभियोग ठराव मांडण्यासाठी आग्रही आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षांचा हा प्रयत्न म्हणजे न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे असे भाजपा नेत्या मीनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे. न्यायव्यवस्थेचे राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी न्याय व्यवस्थेचा अपमान केला आहे असाही आरोप लेखी यांनी केला.

न्यायसंस्थेला वाचवायचे असेल तर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पदावरून काढावेच लागेल अशी टिप्पणी करत विरोधकांनी मिश्रा यांच्यावर महाभियोग चालवावा असा प्रस्ताव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे दिला आहे. या प्रस्तावावर समविचारी ७१ खासदारांनी स्वाक्षरी केल्याचे काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद यांनी सांगितले.

सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट करतानाच लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात विरोधकांनी सुप्रीम कोर्टावर चांगलीच टीका केली होती. मात्र भाजपा नेत्या मीनाक्षी लेखी यांनी आता विरोधी पक्षांना धारेवर धरले आहे. जस्टिस लोया निकालप्रकरणात तर काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे.