विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या चार आमदारांना काँग्रेसने नोटिसा जारी केल्या असून त्यांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली आहे.

अलीकडच्या मंत्रिमंडळ विस्तारात वगळलेले मंत्री जारीखोली, बी.नागेंद्र, उमेश जाधव व महेश कुमटाहळ्ळी यांना या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. काँग्रेस पक्षातील  धुसफुस यातून दिसून आली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक शुक्रवारी झाली होती, तो भाजपविरोधात शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न होता त्या वेळी हे आमदार अनुपस्थित राहिले होते. भाजपने जनता दल (एस) व काँग्रेस यांचे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस मोहिम राबवली होती. चार आमदारांच्या अनुपस्थितीने काँग्रेसला मोठा धोका नव्हता, पण त्यातून काँग्रेसमध्येच चुकीचा संदेश गेला. काँग्रेसमध्ये बंडखोरी असल्याचे दिसून आले. जारीखोली यांना पाठवलेल्या नोटिशीत पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे की, दिल्ली व मुंबईत भाजप नेत्यांशी आपण भेटीगाठी घेतल्याच्या बातम्या असून आपण विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसही उपस्थित नव्हतात त्याचे स्पष्टीकरण करावे. अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कडक कोरवाई केली जाईल असे आधीच  सांगितले होते.

काँग्रेस आमदारांच्या मारामारीत एक जखमी?

कर्नाटकातील राजकीय नाटय़ाने वेगळेच वळण घेतले असून शनिवारी दोन काँग्रेस आमदारांची रिसॉर्टवर मारामारी होऊन त्यात एक जण जखमी झाला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदारांना ठेवण्यात आलेल्या रिसॉर्टवर हा प्रकार झाला असून भाजपने काँग्रेस आमदारांना गळास लावू नये यासाठी त्यांना तेथे ठेवण्यात आले होते. त्या वेळी होस्पेटचे आमदार आनंद सिंह यांना बाचाबाचीनंचर कंपालीचे आमदार जे.एन गणेश यांनी मारहाण केली. दोघेही बळ्ळारी जिल्ह्य़ातील आहेत. सिंह यांचा डोळा काळा निळा झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी छातीत दुखत असल्याचेही सांगितले पण आता त्यांची प्रकृती ठीक आहे. जे.एन गणेश यांचे जिल्ह्य़ातील मुद्दय़ावरून आनंद सिंह यांच्याशी भांडण झाले. ते व्यक्तिगत होते, असे काँग्रेसचे प्रवक्ते  मधू गौड यक्षी यांनी सांगितले.