लोकसभा निवडणुकीतील सपशेल अपयशानंतर देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सध्या राजीनामासत्र सुरू असल्याचे दिसत आहे. झारखंडचे पार्टी अध्यक्ष अजय कुमार यांनी राज्यातील पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. झारखंडमध्ये लोकसभेच्या १४ जागांपैकी भाजपाला ११ तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे. याशिवाय आसाम काँग्रेस प्रदेश अध्यक्ष रिपुन बोरा यांनी देखील राजीनामा दिला आहे. कारण आसामच्या १४ जागांपैकी भाजपाला ९ तर काँग्रेसला केवळ तीनच जागा मिळाल्या आहेत.

देशभरात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्यानंतर, दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या चिंतन बैठकीत दस्तुरखुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतःचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. तर या अगोदर उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर व पक्षाचा पारंपारिक बालेकिल्ला समजल्या जाणा-या अमेठीतही पक्षाला पराभवास सामोरे जावे लागल्याने, येथील जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांच्यासह अनेक नेत्यांनी जबाबदारी स्वीकारत आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ रायबरेलीची जागा मिळाली आहे.

याशिवाय निवडणुकीतील अपयशानंतर मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ, ओदिशा काँग्रेस समितीचे अध्यक्ष निरंजन पटनायक, ओदिशा काँग्रेस कॅम्पेन कमिटी अध्यक्ष भक्त चरण व कर्नाटक काँग्रेस कॅम्पेन समिती अध्यक्ष एच के पाटीलसह अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांनी पदांचे राजीनामे दिले आहेत. तर, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील स्वतः राजीनामा देत सर्व प्रदेशाध्यक्षांनी देखील राजीनामे दिले पाहिजे असे म्हटले होते.