गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेऊन इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत दाखल केलेल्या याचिकेत व्हीव्हीपॅटद्वारे झालेल्या २५ टक्के मतदानाची प्रत्यक्ष इव्हीएममधील मतदानाशी पडताळणी करण्यात यावी, यामुळे निवडणुकीतील पारदर्शकता सर्वांसमोर येईल, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान ही याचिकाच फेटाळून लावली. तसेच निवडणूक प्रक्रियेतील सुधारणेच्या मागणीसह पुनर्याचिका दाखल करण्याची सूचना गुजरात काँग्रेसला केली. काँग्रेसच्यावतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी ही याचिका दाखल केली होती.
SC dismisses Congress' plea seeking directions to EC to count & cross verify at least 25% of VVPAT paper trail with EVM votes. pic.twitter.com/uabJs37oJ5
— ANI (@ANI) December 15, 2017
काँग्रेसने गुजरात निवडणुकीदरम्यान, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गुजरातच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकीदरम्यान काँग्रेसने आरोप केला होता की, निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवाप्रमाणे काम करीत आहे. त्याचबरोबर भाजपने अनेक ठिकाणी इव्हीएम ब्लूटुथशी जोडल्याची तक्रारही काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.
Supreme Court said that it finds no merit in Congress' plea, adds that Gujarat Congress can approach SC through filing a writ petition for electoral reforms.
— ANI (@ANI) December 15, 2017
दरम्यान, यंदा निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीदरम्यान सर्वच मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर केला होता. या इव्हीएमला जोडलेल्या मशीनमध्ये मतदान केल्यानंतर पावती देखील बाहेर येते. यावर आपण कोणाला मत दिले त्याची वेळेसह माहिती मिळते. गुजरातच्या निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील निवडणुकीदरम्यान काँग्रेससहीत इतर पक्षांनीही इव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने इव्हीएम हॅकॅथॉनचे आयोजन केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2017 4:47 pm