जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना कलम ३७० रद्द केल्यापासून काँग्रेसने रडावर घेतले आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यपाल मलिक यांच्या बरीच शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राज्यपाल मलिक यांना त्यांच्या कामावरून लक्ष्य केले आहे. राज्यपाल मलिक यांची भाषा भाजपा नेत्यासारखीच आहे. त्यामुळे त्यांना भाजपाचे जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष करायला हवे, अशी टीका चौधरी यांनी केली आहे.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर टीका केली होती. त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवरूनही राहुल गांधी सध्या आक्रमक झाले आहेत. त्यात आता काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या कामावरून टीका केली आहे. अधीर रंजन म्हणाले, राज्यपाल मलिक यांना भारतीय जनता पार्टीचे जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष करायला हवे. कारण त्यांच्याकडून करण्यात येणारी विधाने भाजपाच्या नेत्यासारखीच आहेत, असा टोला चौधरी यांनी लगावला आहे.

चौधरी यांच्या अगोदर राहुल गांधी यांनी मलिक यांच्याशी वादविवाद करीत आहेत. काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अहवालांचा हवाला देऊन केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती. राहुल एक जबाबदार नेते आहेत. त्यांच्यासाठी विमान पाठवतो, त्यांनी काश्मीरात येऊन पाहावे आणि मग बोलावे, असे आवाहन मलिक यांनी केले होते. राहुल गांधी विरोधी पक्षनेत्यांसह काश्मीरला गेले होते. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधींना श्रीनगर विमानतळावरुनच माघारी पाठवून देण्यात आले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य नाहीय. शिष्टमंडळासोबत गेलेल्या पत्रकारांना वाईट वागणूक देण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी केला होता.